जिल्ह्यात 31 गावांना पुराचा, 45 ठिकाणी दरडींचा धोका

रत्नागिरी:-जिल्ह्यात दहा व अकरा तारखेला ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात नद्यांना पूर येऊन तिरावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तर ४५ ठिकाणे धोकादायक असून तेथे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे गरजेनुसार स्थलांतर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांमध्ये प्रशासनानकडून संबंधित नागरिकांना आगाऊ इशारा दिला आहे. तसेच अतिधोका असलेल्या रहिवाशांना नोटीसा बजवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये ३१ गावे पूर रेषेखाली आली आहेत. राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, काजिर्डा, डोंगर, पांगरी खुर्द, भाबलेवाडी ही ५ गावे, संगमेश्वर तालुक्यात साखरपा, कसबा, कुरधुंडा, नावडी, माभळे, वाशीतर्फे संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी अशी ९,  रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभ्ये ही ४, चिपळूण तालुक्यात पेठमाप, गोवळकोट, मजरेकाशी, खेर्डी, चिपळूण शहर ही ५, खेडमध्ये खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, असलुरे ही ५, गुहागर तालुक्यात वडद, पालशेत, परचुरी ही ३ गावे यांचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणे धोकादायक बनली असून तेथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी प्रशानासनाने खबरदारी घेतली आहे. तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४५ दरडप्रणव क्षेत्र आहेत. त्यामध्ये गोवळकोट, उंबरवाडी, ताम्हाणे, मुसळवेडी (खोरनिनको), साठरे, धोपेश्वर, कळबट, देसाईवाडी, आंबवकरवाडी, देवळे, शेलावरवाडी, मानसकोंड, कातुर्डी, मधलीवाडी, गवळीवाडी, भुईवाडी, जांभारी, कुडली, काजोळकरवाडी, साईबाबनगर, दिवळीवाडी, गुरववाडी, हर्णै, धाकडीवाडी, तेलीवाडी, कडुवाडी, मोरेवाडी, शिगवणवाडी, बहिरवेडी, लोकरण, शिवणे बुद्रुक, बौद्धवाडी, गण्याचा टोक, चिकटेवाडी, मोरेवाडी, कोसरवाडी, नायतवाडी, तिवरे, कुरंग, गोपाणेवाडी, मालदेवाडी, निवेवाडी, गवळीवाडी ठिकाणांचा समावेश आहे.