जिल्ह्यात 14 गावात खाजगी टँकरच्या 277 फेऱ्या

रत्नागिरी:- जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचा दाह वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावू लागला असून जिल्ह्यात आतापर्यंत 6 खाजगी आणि एका टँकरच्या 14 गावात 277 फेऱ्या झाल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यास अजुनही दीड महिन्याचा वेळ असून टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची संख्या यापुढे वाढत जाणार आहे.

कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. दरवषचे हे चित्र असून शासनाकडून ‌‘हर घर नल‌’ योजनेंतर्गत जलजीवन मिशनची कामे सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी निधीअभावी ही कामे रखडली असल्याने घरोघरी पाणी येण्यास अजून बराच कालावधी लागणार आहे. यामुळे दरवषप्रमाणेच यंदाही टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात खेड, चिपळूण आणि रत्नागिरीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिरगाव, नाचणे, सडामिऱ्या, सोमेश्वर, खेडशी या पाच गावातील 25 वाड्यांमध्ये 10260 लोकांना शासकीय पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत 256 फेऱ्या झाल्या आहेत. चिपळूण तालुक्यात टेरव, अडरे, कोंडमळा, सावर्डा, कुडप, अनारी, कादवड या सात गावातील 8 वाड्यांमधील 468 लोकांना एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत टँकरच्या 12 फेऱ्या झाल्या आहेत. खेड तालुक्यात घेरारसाळगड आणि खवटी या दोन गावातील दोन वाड्यांमधील 210 लोकांना एका खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत या टँकरच्या 9 फेऱ्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात यापुढील कालावधीत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंधारे आणि तलावातील पाणी बाष्पीभवनामुळे आटण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न गडद होणार आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होऊन टँकरच्या फेऱ्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.