शासनाची मोफत मोहीम; 20 लाख 11 हजाराचे लक्ष्य
रत्नागिरी:- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व खातेदारांना मोफत घरपोच डिजिटल सातबारा देण्याची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 539 गावातील सुमारे 20 लाख 22 हजार 678 सातबारा उतारे संगणकीकृत झाले असून आतापर्यंत 11 हजार 491 जणांना डिजिटल सातबार्यांचे वाटप केले आहे.
सातबारा वितरणासाठी प्रत्येक तालुक्यात प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूली मंडळ निहाय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महात्मा गांधी जयंतीदिनी त्याचा आरंभ झाला. यामध्ये राजापूर तालुक्याने आघाडी घेतली असून चिपळूण तालुक्यात सर्वात कमी वाटप झाले. शासनाच्या महसूल विभागामाफत अनेक ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना, सातबारा, 8 अ, फेरफार व मिळकत पत्रिका यांचा समावेश आहे. शासनाच्या संकेतस्थळावर हे सर्व आवश्यक उतारे डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहे. विहीत शुल्क भरुन कोणीही व्यक्ती जगाच्या पाठीवरुन कोणत्याही ठिकाणावरुन अभिलेख दस्ताऐवज प्राप्त करुन घेऊ शकतो. स्वाक्षरी असलेले दस्ताऐवज कोणत्याही शासकीय, कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. एखाद्या गावात किती फेरफार प्रलंबित आहेत, त्यांची मुदत किती आहे, नोटीशीची प्रत, फेरफारवरील हरकत आली आहे काय आदी माहिती घरी एका क्लिकवर मिळू शकते.