रत्नागिरी:-जुलै महिन्यात सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या खोर्यातील पोसरे, बाऊलवाडी, पेढे, तिवरे, दख्खनमधील गावांसह अनेक ठिकाणी दरडी कोसळून जमिनीला भेगा पडल्या आहेत. जीवीतहानी टाळण्याच्या उद्देशाने बाधित ठिकाणांचा पुणेच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 109 बाधित ठिकाणांची यादी पाठवण्यात आली आहे. तसेच धोकादायक आणि दरडग्रस्त भागातील कुटूंबांचे तात्पुरत्या व कामयस्वरुपी पुनर्वसनही केले जाणार आहे.
सलग पडलेल्या पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले आहे. पोसरे, पेढे येथे जीवीतहानीही झाली. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ संबंधित ठिकाणांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पुर्वी बाधित झालेल्या 45 गावांचा अभ्यास केला होता. भूवैज्ञानिक मानांकाच्या आधारे उच्च प्रवणतेनुसार 1 ते 4 वर्गवारीही केली. तेथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने सुचना दिल्या आहेत. त्या व्यतिरिक्त यंदा भूस्खलन, दरड कोसळल्याने धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि पुणेतील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्या गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे आणि कोणत्याही प्रकारे जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तहसिलदार यांनी ‘इन्सीडंट कमांडर’ या नात्याने आवश्यक ते आदेश काढावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे पोसरेखुर्द (ता. खेड) येथील दरड कोसळून पूर्णतः जमीनदोस्त झालेली 8 आणि पोसरे बुद्रुक येथील 1 अशी एकूण 9 कुटूंबे आहेत. त्या ठिकाणी पुन्हा भुस्खलनाचा धोका असल्यामुळे 12 कुटूंबे आणि पेढे कुंभारवाडी (ता. चिपळूण) येथील दरड कोसळून पूर्णतः क्षतीग्रस्त झालेली 5 कुटूंबे अशा एकुण 26 कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन अलोरे (ता. चिपळूण) येथील कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीमधील रिक्त निवासस्थानी करण्यात येत आहे. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी सुरक्षित शासकीय आणि खासगी जागा निश्चित करुन पुनर्वसन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी व खेड तहसिलदार यांना जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत.