टँकरने पाणी पुरवठा; तिव्रता वाढण्याची शक्यता
रत्नागिरी:- जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा वाढतच चालला आहे. परिणाामी पाणी टंचाईच्या तीव्रतेमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३० गावांतील ९९ वाड्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेबरोबरच जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत आहे. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीवÏता कमी होईल असे वाटले होते, परंतु उष्णतेची लाट गेले दोन दिवस सुरु आहे. कडक उन्हाळयामुळे भूजल पातळीत कमालीची घट निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्याचा रखरखाट आणखीनच उग्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. या टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनस्तरावरून धावपळ सुरू झाली आहे.
यावर्षी चिपळूण आणि लांजा या दोन तालुक्यांना या पाणीटंचाईने ग्रासले आहे. येथील धनगरवाड्यांना पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसलेली आहे. तेथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या फेर्या सुरू झालेल्या आहेत. मे महिन्यात यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सध्यातरी ३० गावातील ९९ वाडींमधील २८ हजार १७३ लोकांची तहान टँकरने भागवावी लागत आहे. यासाठी मात्र केवळ सातच टँकर उपलब्ध असल्याने पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.