रत्नागिरी:- जलयुक्त शिवार अभियानाच्या नव्याने राबविण्यात येणार्या दुसर्या टप्प्यात जिल्ह्यातील 243 गावांत अंमलबजावणी केली जाणार आहे. या गावांची नावे निश्चित करण्यात आली असून, कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहेे.
जलयुक्त शिवार योजना 2015 ते 2019 या कालावधीत राबविली गेली. मात्र, मध्यंतरी ही योजना गुंडाळली होती. नव्या शासनाने जलयुक्त शिवार अभियान-2 ही योजना पूर्वीप्रमाणेच मात्र काही निकषांमध्ये बदल करत सुरू केली आहे. त्यासाठी अंमलबाजवणीही सुरू करण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यातील या अभियानाच्या यशस्वितेसाठी मृद व जलसंधारणाच्या कामात सर्व सरकारी यंत्रणांनी लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच निमसरकारी आणि खासगी संस्थांचाही सहभाग घेण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी सर्व विभागांना केली आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांमधील कामांचा कृती आराखडा सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात येणार आहे. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरीद्वारे प्रचार आणि प्रबोधन करण्यात येणार आहे. पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करताना प्राधान्यक्रमानुसार कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्यात येणार आहे.
दुसर्या टप्प्यात नव्याने आकृतीबंध करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना जाहीर करण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षापासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या योजनेच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असून, जिल्ह्यात
यापूर्वी जलसंधारणची कामे
झालेली गावे वगळून पहिल्या वर्षी 243 गावांची निवड निश्चित केली आहे.









