जिल्ह्यात २१ हजार बांधकाम कामगारांची नोंद

बनावट नोंदणी रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

रत्नागिरी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांसाठी ३२ हून अधिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, अलिकडच्या काळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट नोंदणीचे प्रमाण वाढत असल्याने, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

गेल्या वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील २ हजार ८१५ कामगारांना सुमारे ४ कोटी ७६ लाख ५४ हजार ६१७ रुपयांच्या गृहोपयोगी संचांचे वाटप करण्यात आले आहे. या संचांमुळे कामगारांच्या दैनंदिन जीवनातील गरजांना मोठा आधार मिळाला आहे.

मंडळाच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक अशा ३२ योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची अधिकृत नोंदणी असणे अनिवार्य आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ७०१ नवीन कामगारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पात्र कामगारांनाच या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.

काही जिल्ह्यांमध्ये अनधिकृत संस्था आणि दलालांनी या योजनांना विळखा घातल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रे सादर करून योजना लाटण्याचे प्रकार घडत असल्याने कामगारांची फसवणूक होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून विशेष सजगता बाळगली जात असून, कामगारांनी अधिकृत मार्गानेच नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार असे
तालुक्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार ः मंडणगड-१३१, दापोली-१७९०, खेड-४३८८, चिपळूण-२७४७, गुहागर-१५२५, संगमेश्वर-१९१९, रत्नागिरी-३८६७, लांजा-२५८०, राजापूर-२७५४ अशी