जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण; गुलाबी थंडीची अद्याप प्रतीक्षा

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टी भागात कमाल आणि किमान तापमानातील चढउतार सुरुच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण पुढील चार ते पाच दिवस राहणार आहे. मात्र किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे पहाटे हलक्या थंडीची मात्रा लागू पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरीही गुलाबी थंडीची कोकणात अद्याप प्रतीक्षाच आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडी पडेल, अशी आशा होती. मात्र जानेवारी महिन्यातही जैसे थे परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
किनारी भागात किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानाचा पारा देखील अजून चढा आहे. त्यामुळे वातावरणात उष्मा जाणवत आहे. थंडी पडण्यासाठी किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात देखील घसरण होणे गरजेचे आहे. दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीमुळे केरळ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच श्रीलंकेच्या किनार्‍यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वार्‍यांची स्थिती कायम आहे. परिणामी जानेवारी ते मार्च या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र ,कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाची शक्यता कमी राहणार आहे.