सहा तालुक्यात पावसाची नोंद; केरळमधून वेगाने प्रवेश
रत्नागिरी:- नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनचा केरळ येथून सुपर फास्ट प्रवास सुरु झाला असून शनिवारी गोव्यासह महाराष्ट्रात धडक मारली. दक्षिण कोकणात मान्सूनने हजेरी लावली असून रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे (ता. दापोली) येथून आगमन झाले; मात्र हर्णे किनारपट्टीला शनिवारी फक्त दोनच तास पाऊस झाला. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन अपेक्षित असे झाले नाही. रत्नागिरी तालुका वगळता गुहागर, दापोली, चिपळूण, लांजा, खेड, हर्णे येथे पावसाची नोंद झाली.
अंदमानापासून पुढे केरळपर्यंतची मॉन्सूनची वाटचाल काहीशी मंदावली होती. मॉन्सून 3 जूनला लक्षद्वीप आणि दक्षिण केरळात दाखल झाला. त्यामुळे कोकणात चार दिवस लागतील असा अंदाज होता; परंतु कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेगाने वारे निर्माण झाले आणि मॉन्सून सुपरफास्ट गतीने मॉन्सूनचा प्रवास सुरु झाला. गोव्यातून, कोकणमार्गे मॉन्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील काही दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
मॉन्सूनचे आगमन रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथून झाले. याठिकाणी सलग तिन दिवस अडीची मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यानंतर तो दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागांकडे रवाना झाला. मॉन्सून दाखल झाला तरीही रत्नागिरी तालुक्यात दिवसभर पावसाची नोंद झाली नाही. तीच दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी पाऊस पडेल अशी शक्यता होती, पण वारे वाहू लागल्यामुळे कडकडीत उन पडले होते. शनिवारी दिवसभरात गुहागर 1 मिमी, दापोली 4 मिमी, चिपळूण 2 मिमी, लांजा 2 मिमी, खेड 2 मिमी, हर्णे 1 मिमी पावसाची नोंद झाली. वेळेत मॉन्सून दाखल झाल्याने खरीप हंगामाच्या कामांना वेग येणार आहे.
दरम्यान, तौक्ते वादळनंतर हलका पाऊस झाल्यामुळे दापोली तालुक्यात शेतकर्यांनी नागरणीला सुरुवात केली. हर्णैमध्ये मॉन्सूनचे आगमनाची नोंद झाली असली तरीही दिवसभरात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर कोरडाच गेला. पावसाळा सुरू होणार असल्याने हर्णे बंदरातील मच्छीमारांनी देखील आपल्या नौका शाकारुन ठेवल्या आहेत.