अनेक ठिकाणी पूरस्थिती
रत्नागिरी:- अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस जिल्ह्यात नारळी पोर्णिमे पासून पुन्हा सक्रिय झाला आहे. सोमवारी रात्री पासून जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
सोमवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यानी अनेक भागात प्रचंड नुकसान केले आहे. विजेचे खांब कोसळल्याने अनेक भागातील वीज गायब होती.
मुसळधार पावसामुळे चांदेराई येथिल बाजारपेठाच्या रस्त्यावर पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. यासह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांना अलर्ट देण्यात आला आहे.
काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराईप्रमाणे, टेंभ्येपूल, सोमेश्वर, काजरघाटी आदी सखल भागात पाणी शिरले. यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या वर्षीच्या आलेल्या महापुरामुळे भातशेती वाहून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनामुळे चार महिने घरात बसलेल्या शेतकर्यांवर आता पुन्हा महापुराचे संकट ओढवणार आहे.