जिल्ह्यात भात लावणीचे ४० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी:- सध्या पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे पाऊस परिसरामध्ये भात लावणीच्या कामाला वेग आला असून, आत्तापर्यंत 40 टक्के भात लावणी करण्यात आली आहे. दरवर्षी यावेळेस भात लावण्या पूर्णत्वास गेलेल्या असतात व भात बेनीचे काम सुरू असते.

परंतु, यावर्षी पावसाने आपला प्रवास लांबवल्यामुळे भात पेरणीच्या कामाला फारच उशीर झाला होता. त्यात पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे सर्वच कामांचा खोळंबा झाला होता. त्यानंतर पावसाने काही प्रमाणात सुरुवात केल्यामुळे भात पेरण्या पूर्ण होऊन भाताची रोपे तयार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍यांचा भात लावणीच्या कामाकडे कल सुरू राहिला. त्यानंतर भात शेतीला पोषक असेल पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.