रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून २९ हजार ६२९ मातांना १२ कोटी ५७ लाख २६ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे उद्दीष्ठ शंभर टक्केपेक्षा अधिक झाले आहे.
दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. प्रसुतीनंतर शारिरिक क्षमता नसतानाही काम करावे लागते. याचा परिणाम गर्भवती महिला व नवजात बालकांवर होतो. त्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. त्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत मातांना अनुदान दिले जाते. जिल्हयात कोविड काळात उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिलेल्या उद्दीष्ठापेक्षा अधिक लक्ष करण्यात यश आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. राजन शेळके, प्रविण डुब्बेवार यांनी यामध्ये मेहनत घेणार्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पात्र लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.