जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरु

रत्नागिरी:- जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.

पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे कार्यक्षम वितरण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक पाऊल पुढे आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह, रहिवासी आता सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी न घेता त्यांच्या रेशन कार्डसाठी सोयीस्करपणे अर्ज करू शकतात आणि प्राप्त करून घेवू शकतात. ई-शिधापत्रिकामध्ये विशिष्ठ क्यूआर कोड दिला आहे. दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांची विशेष नोंद यामध्ये घेण्यात येणार आहे.
अर्जदारांना शिधापत्रिकासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून, योजनेच्या प्रकारानुसार सेवाशुल्क भरून ऑनलाइन ई-शिधापत्रिका प्राप्त करून घेता येईल. त्यानंतर ई-शिधापत्रिका डाउनलोड करण्याकरिता निःशुल्क सेवा देण्यात येईल. जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पहिले. याकरिता प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी रिद्धी गोरे यांनी मार्गदर्शन केले. पुरवठा निरीक्षक मनोज पवार व तांत्रिक सहायक सारिका साळवी हे उपस्थित होते.