Friday, September 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा

जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासीयांना एकाचवेळी कडक उन्हाचा उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या अधूनमधून पावसाची हजेरी लागत आहे. यंदा पाऊस लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सध्या मळभाचे वातावरण दिसू लागले असून पाऊस कुठल्याही क्षणी पडेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

रत्नागिरीत कमालीचे उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोबतच, जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज रविवारी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. १८ मे रोजी हवामानात किंचित बदल होऊन हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर १९ आणि २० मे या दोन दिवसांत पाऊस काहीसा ओसरेल, मात्र तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश एवढे वाढले होते. रविवारी देखील हीच अवस्था होती. त्यामुळे उन्हाचे चटके आणि घामांच्या धारा त्रासदायक होत होत्या. पाऊस लवकर येण्याचे संकेत मिळत असले तरी सध्या उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. नागरिकांना सकाळी ११ वाजल्यापासूनच बाहेर पडणे असह्य होत आहे. सकाळी अगदी ८ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता कमालीची वाढू लागली आहे. आणखी काही दिवस ही स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.