जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक ठिकाणी पडझड

रत्नागिरी:- आषाढी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यात सगळीकडेच सरींचा पाऊस सुरु होता. मात्र ठिकठिकाणी पावसामुळे झाडे पडणे, मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते खचणे असे प्रकार घडले आहेत. या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत.

गुरुवारी (ता. 29) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 101, दापोली 103, खेड 71, गुहागर 131, चिपळूण् 84, संगमेश्‍वर 75, रत्नागिरी 94, लांजा 79, राजापूर 72 मिमी नोंद झाली. 1 जुनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 355 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत 588 मिमीची नोंद होती. तुलनेत 200 मिमी कमी पाऊस झाला. गेले दोन दिवस संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी आषाढीच्या मुहूर्तावर पावसाने सकाळच्या सत्रात सुरवात केली. एक मोठी सर पडून गेल्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. सर्वच तालुक्यात हेच चित्र होते. पावसामुळे चिपळूण तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झाली. सुमारे दोन तास वाहतूक थांबली होती. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. साखरपा ते देवरूख रस्त्यावर देवरूख येथे झाड पडल्याने वाहतूकीत अडथळा निर्माण झाला होता. ते बाजूला करण्याचे काम सुरु होते. पावसाचा फटका मुंबई – गोवा महामार्गाला बसला आहे. हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र मातीचा भराव खचणे न थांबवल्यास आणि पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. तेथे तात्पूरत्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.