जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरु लागला असला तरीही रत्नागिरी तालुक्यात आरे-वारेसह पेठकिल्ला येथे दगड, माती रस्त्यावर आली होती. ती तात्काळ हटवून वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. ५ जुलैपर्यंत किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ९५ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड तालुक्यात ५१, दापोली ७३, खेड ४५, गुहागर १५९, चिपळूण ४४, संगमेश्वर ६८, रत्नागिरी १२३, लांजा १४५, राजापूर १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली. दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील तुकाराम लक्ष्मण रेवाळे यांचे अतिवृष्टीमुळे घराचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यातील काजूर्लींच्या मिलिंद गणू रेवाळे यांच्या घराचे पत्रे वादळी वार्‍याने उडाल्याने २ लाख ३३ हजार ३२० नुकसान झाले. संगमेश्‍वरातील नाथरी, मराठवाडी येथील वंदना गंगाराम राक्षे यांच्या गोठ्याला अचानक आग लावून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील पेठकिल्ला, कुरणवाडीत दरड कोसळून पायवाट बंद झाली होती. तात्काळ नगरपालिकेकडून पायवाटेवर पडलेली दगड, माती बाजूला करुन पायवाट सुरळीत करण्यात आली. तसेच आरे-वारे येथे पुलाजवळ रस्त्यावर दरड कोसळली होती. तात्काळ दरडीचे दगड, माती बाजूला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.

नद्यातील जलस्तर वाढतोय

नद्यातील जलस्तर वाढू लागल्याने नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये आता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खेड तालुक्यात जगबुडीच्या पात्रात जलस्तर आता पावसाच्या सक्रियतेमुळे वाढू लागला आहे.  जगबुडीची इशारा पातळी ५ मिटर आहे. आता या नदीतील जलस्तर ४.६५ मि.मी. ने उंचावला आहे. वाशिष्ठीचे पात्र इशारा पातळीच्या क्षमतेपेक्षा निमपट आहे. वाशिष्ठी नदीत सध्या २.४० मिटर जलपातळी गाठली असून तिची इशारा पातळी ५ मीटर आहे.