रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नव उद्योजकांनी केलेल्या कर्जाचे प्रस्ताव बँकांकडून नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांकडे सादर केलेल्या २००३ पैकी १ हजार ११७ प्रस्ताव नाकारले आहेत. आतापर्यंत अवघे २२९ प्रस्ताव मंजुर झाले आहेत.
ग्रामीण व शहरी भागात नवीन उद्योजकांनी पुढे येवून व्यवसाय करावा, या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना शासनाने हाती घेतली आहे. यामध्ये ५० हजार रुपयांपासून ५० लाखांपर्यंत कर्जावर ३५ टक्केपासून अधिक अनुदान दिले जाते. सर्व प्रकारचे प्रक्रिया उद्योग आणि काही सेवा व्यवसायांचा या योजनेत समावेश आहे. योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम, जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग केंद्राकडे सोपवण्यात आले आहे. त्यांना दर वर्षी लक्षांक दिले जाते. यंदा शासनाने ८०० कर्जप्रस्ताव मंजुरीचे लक्ष्य दिले आहे. त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्ज मागविण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेल्या अर्जांची छाननी करुन ते बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. आतापर्यंत २ हजार ३ प्रस्ताव कर्जांसाठी प्राप्त झाले होते. त्यातील १ हजार ११७ प्रस्ताव नामंजुर केले असून अवघे २२९ प्रस्तावांना बँकांनी हिरवा कंदिल दिला आहे. ६५७ प्रस्ताव विविध बँकांकडे प्रलंबित आहेत. एकीकडे शासन रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पावले उचलत आहे, मात्र उद्योगांसाठी तरुणांना कर्ज मिळत नाही. प्रस्ताव नाकारताना सीबील खराब, अपुरे कागदपत्रे अशी कारणे दिली जातात. तर काहीवेळा उमेदवार पाठपुरावाच करत नसल्याचे बँकांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबर महिन्यात घेतला होता. त्यांनी बँकांना प्रस्ताव मंजुरीच्या दृष्टीने सकारात्मक रहा अशा सुचनाही दिल्या होत्या. त्यावेळी काही तरुण अल्पबचत सभागृहात उपस्थित होते. त्यानंतरही एकुण प्रस्तावांच्या तुलनेत मंजुर होणार्यांची संख्या कमीच राहीली.
मागील महिन्यात विविध बँकांनी १०७ अर्ज मंजूर केले होते. पालकमंत्र्यांच्या आढाव्यानंतर दिड महिन्यात १२२ प्रस्ताव मंजुर झाले. यंदाच्या वर्षासाठी आठशे प्रस्ताव मंजुरीचे जिल्हा उद्योग केंद्राचे लक्ष्य अपुर्ण राहणार आहे. किमान पुढील दोन महिन्यात प्रलंबित असलेल्या ६५७ प्रस्तावांतील बहुसंख्ये उद्योगांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्राकडून सुरु आहेत.