Thursday, May 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ‘कर्नाटक गँग’ उघडकीस

जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ‘कर्नाटक गँग’ उघडकीस

कार, ७ मोबाईल आणि ९ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात

राजापूर:- राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या चार संशयीत आरोपींची गाडी राजापूर पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. या गाडीत सात मोबाईल व नऊ हॉटेल व लॉजिंगची नोंदणी रजिस्टर आढळून आली असून तीही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान हे चारही संशयीत आरोपी हे कर्नाटक येथील असल्याचे तपासात पुढे आले असून राजापूर पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल अशी माहिती राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे.

सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड येथे रूम बघण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये येवून हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेवून या चारही संशयितांनी पोबारा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान याच दिवशी संगमेश्वर येथे देखील या चारही आरोपींनी हॉटेल श्रध्दा मध्ये अशाच प्रकारे ग्राहक नोंदणी रजिस्टर लांबवत पळ काढला होता. ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात येताच त्याने संगमेश्वर पोलीसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तत्काळ नाकाबंदी केली.

दरम्यान पोलिसांची सर्वत्र नाकाबंदी असल्याचे लक्षात येताच या संशयितांनी वापरलेली गाडी हुंडाई गाडी क्र. के.ओ. ५१ एम.जी. ६९०५, रंग निळा ही महामार्गावर तुरळ येथे सोडून पळ काढला. सावर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ ही गाडी ताब्यात घेतली. या संशयित आरोपींनी राजापूरातील हॉटेल फुडलॅन्ड येथून रोख सहा हजार रूपये लांबविल्याचे तर संगमेश्वर येथील एका हॉटेलमधून साडेपाच हजार रूपये लांबविल्याचे पुढे आले असून या हॉटेल मालकांच्या तक्रारीवरून राजापूर व संगमेश्वर पोलिसांनी या चारही संशयित आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान राजापूर पोलीसांनी मंगळवारी उशीरा या आरोपींनी वापरलेली ती गाडी ताब्यात घेतली आहे. सदरची गाडी राजापुरात आणणे शक्य नसल्याने ती सावर्डा पोलीस स्थानकात जमा करून ठेवण्यात आली आहे. दरम्यान त्या गाडीत सापडलेले सात मोबाईल फोन व नऊ नोंदणी रजिस्टर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. या सात पैकी सहा एन्ड्रॉईड मोबाईल असून दोन साधे मोबाईल आहेत. यात एक आयफोन देखील आहेत. या सर्व मोबाईल मधील सीमकार्ड ही कर्नाटक राज्यातील आहेत. याद्वारेही तपास सुरू आहे.

या प्रकरणी पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीही सापडतील असा विश्वास पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख तपास करत आहेत.