रत्नागिरी:- दिवाळीच्या सुट्टी सुरु झाली असून पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली आहेत. परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला होता. पर्यटकही कोकणातील पर्यटनस्थळांवरील लॉजिंग धारकांकडे चौकशी करुन नियोजन करु लागले आहे. बुधवारी कडकडीत उन पडल्यामुळे पुढील आठवड्यात पर्यटकांचा राबता वाढण्याची शक्यता आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा संपल्यानंतर दिवाळी सुट्टीला आरंभ झाला. त्यामुळे चाकरमान्यांची पावले आपसूकच कोकणातील गावाकडे वळलेली आहेत. मुंबई, पुण्यासह परजिल्हावासीय पर्यटनाचे वेळापत्रक बनवू लागले आहेत. अनेकजणं दिवाळीपुर्वी फिरायला जाण्याची ठिकाणे निश्चित करुन निवासाचे ऑनलाईन आरक्षण करुन ठेवतात. यंदा मागील आठवडाभर राज्यभरात मुसळधार पाऊस पडत होता. रत्नागिरी जिल्ह्यातही परिस्थिती तशीच होती. त्यामुळे अनेकांनी निवासाचे आरक्षण केलेेले नाही. ते पावसाच्या परिस्थितीचा दुरध्वनीवरुन आढावा घेत आहेत. त्यावरच फिरण्यासाठी कुठे जायचे ते अवलंबुन राहील आहे. यावर्षी बहूसंख्य पर्यटक कुटूंब आरक्षण न करताच थेट त्या-त्या ठिकाणी फिरायला बाहेर पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. याल गणपतीपुळेतील व्यावसायीकांकडूनही दुजोरा मिळत आहे. मागील आठवड्यात काही पर्यटकांनी पावसाची परिस्थिती पाहून आरक्षण रद्द केली होती. दुरवरुन येणार्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक वन डे ट्रिपचे नियोजन करत आहेत. त्यामुळे प्रसिध्द पर्यटनस्थळ गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची उपस्थित अन्य दिवसांपेक्षा लक्षणीय आहे. गेले दोन दिवस चार ते पाच हजार पर्यटक येऊन गेल्याची नोंद गणपती मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये झाली. अभ्यंगस्नान, लक्ष्मीपुजन, पाडवा आणि भाऊबिज आटोपली की दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बाहेर पडतात. गुरुवारी (ता. 23) भाऊबिज आहे. त्यानंतरच खर्या अर्थाने पर्यटनाला आरंभ होईल असा अंदाज आहे. वातावरणाचा अंदाज घेऊनच पर्यटक फिरण्याची ठिकाणं ठरवणार आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील किनारी भागांसह धार्मिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा अधिक राहील.