जिल्ह्यात दररोज सात हजार चाचण्या करण्यात प्रशासनाला यश 

रत्नागिरी:- दररोज सात हजार चाचण्या करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना मंगळवारी यश आले. चोवीस तासातील 7 हजार 212 चाचण्यांमध्ये 519 जणं कोरोना बाधित आले. मृतांचा आकडा कमी झाल्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला. दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतची ही सर्वात कमी नोंद आहे.

पॉझिटीव्हीटी दर वाढल्यामुळे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यातच राहीला होता. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सात हजार चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होतो. गेल्या आठ दिवसात पाच हजारापर्यंत मजल मारण्यात यश आले; मात्र मंगळवारी सरसकट चाचण्या वाढविल्याने दिवसभरात 7 हजार 212 चाचण्या झाल्या. त्यातील 6 हजार 696 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 13 टक्केवर पोचला आहे. चाचण्यांमध्ये वाढ झाली तरीही जिल्ह्यात चारशे ते पाचशेच्या दरम्यान बाधित सापडत आहे. त्यात मोठ्याप्रमाणात घट होत नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढे चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 57 हजार 926 बाधित आढळले आहेत. दिवसभरात 634 जणं कोरोनामुक्त झाले असून एकुण बरे होण्याची संख्या 50 हजार 554 आहे. त्यामुळे बरे होण्याचा दर 87.27 टक्के आहे. जिल्ह्यातील 3 लाख 25 हजार 081 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील मृत्यूदर चिंतेची बाब बनलेला होता. साडेतीन टक्केपर्यंत पोचलेला मृत्यूदर मंगळवारी घटला आहे. मंगळवारी दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणार्‍यांची संख्या आणि घटलेला मृत्यूदर हे जिल्हावासीयांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. चार मृतांमध्ये दापोली, लांजा, रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्यातील प्रत्येक एकाचा समावेश आहे.