जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; रत्नागिरीत धावला पहिला टँकर

रत्नागिरी:- सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कडक उन्हामुळे भूजल पातळी खालावत निघाली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईला सुरुवात झाली असून पहिला टँकर रत्नागिरी तालुक्यातच धावला आहे. तालुक्या सोमेश्वर या गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भौगोलिक परिस्थितीचे कारण सांगितले जात असले तरी पाणी साठवण्यासाठी शासकीय तसेच जनतेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यात अधिकार्‍यांची मानसिकताही महत्वाची ठरत आहे. जिल्ह्यात धरणांची संख्याही फारच कमी आहे. फेब्रुवारी, मार्च महिना उजडला की पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी टंचाईला थोडा उशीरा झाला.

जिल्ह्यात यावर्षी पहिलाच टँकर हा रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. गतवर्षी लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला होता. यावर्षी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर या गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी पाण्यासाठी टँकरची मागणी केल्याचे समजते.

चालु वर्षी जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाला नुकतीच मंजूरी मिळाली असून तब्बल 357 गावांतील 722 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी 9 कोटी 49 लाख 70 हजार रुपयांची आवश्यकता आहे. यावर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वांधिक पाणी टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.