जिल्ह्यात गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या ९२ जणांच्या शिधापत्रिका रद्द

रत्नागिरी:- राज्य राज्यभरात शिधापत्रिकेसाठी (रेशनकार्ड) ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे. त्यात गरिबांच्या धान्यावर बेकायदेशीरपणे डल्ला मारणाऱ्या अनेक प्रतिष्ठांना धक्का बसला आहे. शिधापत्रिका तपासणी मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील ९२ जणांची शिधापत्रिका जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केली आहेत. ही मोहीम अशी पुढे सुरू राहणार असल्याचे महिती पुरवठा विभागाने सांगितले.

सरकारी अन्नधान्य योजनेला लागलेली सुखवस्तूची वाळवी अधिक काळ सर्वसामान्यांना पोखरू नये यासाठी शासनाने आधारकार्डच्या मदतीने ई-केवायसी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनेक बोगस शिधापत्रिकाधारकांचा पर्दाफाश झाला आहे. त्याच्या नावांची नोंदणी रद्द केली आहे. रत्नागिरीत जिल्हा पुरवठा विभागाने मे २०२५ अखेर केलेल्या तपासणीत ४ लाख ४५ हजार ३१९ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात नव्याने वितरित केलेल्या ५५६ कार्डाचा समावेश झाला आहे तर ९२ कार्ड रद्द केले असून, त्यात शुभ्र २३, केशरी २९, केशरी १२ कार्डाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत १८ लाख रेशनकार्ड रद्द करण्यात आली आहेत.