जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा

रत्नागिरी:- जिल्ह्यात लसीकरण मोहिम चांगल्या प्रकारे चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन डोस कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात ६० हजारहून अधिकजणांना कोव्हॅक्सिनची आवश्यकता असताना फक्त २५ हजार डोस शिल्लक आहेत.

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांप्रमाणे तिसरी लाट देशामध्ये तेवढी प्रभावी नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना झालेले ८० हजारहून अधिकजण आहेत. तर अडीच हजारहून अधिक मृत्यूमुखी पडले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर जिल्ह्यात लसीकरण मोहीमेची जागृती निर्माण झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९ लाखाहून अधिक डोस वितरीत केले गेले आहेत. त्यात पहिला डोस झालेल्यांची संख्या १० लाख ५१ हजार ६०८ तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ८ लाख ५१ हजार ९९९ इतकी आहे.
अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांची संख्याही लसीकरणासाठी वाढत आहे. त्याचप्रमाणे १५ वर्षांवरील विद्यार्थीही लसीकरणासाठी पुढे येत आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन ही लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात सध्या २५ हजार डोस कोव्हॅक्सिनचे उपलब्ध आहे. दुसर्‍या डोससाठी याची मागणी वाढली असून यासाठी सुमारे ६० हजार जणांना ही लस आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्य व केंद्र शासनाकडूनच ही लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कोव्हॅक्सिनसाठी नागरिकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

कोव्हॅक्सीनची मात्रा कमी प्रमाणात असली तरीही अत्यावश्यक असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. आवश्यक मात्रांची मागणी करण्यात आली आहे.

– डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी