रत्नागिरी:-तौक्ते चक्रीवादळाचा तिव्रता वाढली असून आज दुपारपर्यंत चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोळगड किनारी धडकण्याची शक्यता आहे. वादळापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी तालुक्यातील 365 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना धोका निर्माण झाला आहे. या पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
राजापूर आणि गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील 85 कच्च्या घरातील 365 नागरिकांचे परिसरातील आजूबाजूच्या घरात स्थलांतरण सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासात 124 मिमी पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 39 मिमी पाऊस पडला. संगमेश्वरात 22 मिमी, दापोली आणि गुहागरात प्रत्येकी 12 मिमी, लांजा आणि राजापूरला प्रत्येकी 13 मिमी पाऊस पडला.