सर्व ग्रामपंचायतीना आरोग्य विभागाचे हिरवे कार्ड
रत्नागिरी:- पाऊस सुरु झाल्याने साथ रोगांचा फैलाव होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते. या साथ रोगांमध्ये पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पाणी स्वच्छता विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. दरवर्षी जलस्त्रोतांची तपासणी करून लाल, पिवळे व हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाते. यावर्षी जि.प. ने केलेल्या जलस्त्रोत तपासणीत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला लाल किंवा पिवळे कार्ड देण्यात आले नाही. सर्वच्या सर्व 846 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळते. त्यामुळे गावात साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी दूषित होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीतर्फे लोकसहभागातून विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 846 ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी गावातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत, शासकीय शाळा, अंगणवाडी, इमारती, मंदिरांची स्वच्छता करण्यात यावी, पावसाळ्याच्या सुरुवातीला गावातील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बांधण्यात आलेले शोषखड्डे स्वच्छ करावेत, सर्व गटारे व नाले स्वच्छ करुन प्रवाहित करावेत.
गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरी व इतर स्रोतांची स्वच्छता करावी व सभोवतालचा परिसर स्वच्छ करावा. गावात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी गावात कोरडा दिवस पाळावा. डेंग्यू, मलेरीया या साथ रोगाबद्दल जनजागृती करावी. त्याबाबतचे फलक गावात चौका चौकात लावावेत. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाणी पुरवठा कर्मचारी यांनी सुपर क्लोरीनेशन करावे, गावामध्ये पुरेसा टीसीएलचा साठा करण्यात यावा तसेच दररोज नियमितपणे पाणी नमुने घेण्यात यावेत व गावाला शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा. गावातील सर्व कुटुंबांना पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्लोरचे वाटप करण्यात यावे.
त्याचबरोबर स्वच्छता सर्वेक्षण मान्सून पूर्व व मान्सून पश्चात सार्वजनिक पिण्याच्या स्रोतांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत 7 हजार 364 जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सर्वच ग्रामपंचातींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.