जिल्ह्यातील 7 हजार 790 जलस्रोतांची होणार तपासणी

रत्नागिरी:- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून, 2 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीमधील 7790 सार्वजनिक स्रोत आहेत.पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर असे वर्षातून दोन वेळा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. सदर सार्वजनिक स्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी यांच्यावर या सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. हे अत्यंत वैशिष्टपूर्ण सर्वेक्षण असून, सर्वेक्षणाच्या निकषांनुसार तसेच स्रोतांच्या जोखीमेनुसार वर्गीकरण करुन व ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरीत केले जाणार आहे.

लाल कार्ड : ग्रामपंचायतींमधील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमींच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात यावे. ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एका गावात जरी वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावांचे नाव टाकून लाल कार्ड देण्यात येणार आहे.

हिरवे कार्ड : ग्रामपंचायतीमधील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून असल्यास त्या ग्रामपंचायतीला हिरवे कार्ड देण्यात येणार आहे.

पिवळे कार्ड : ग्रामपंचायतीमधील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्त्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड देण्यात येणार आहे. ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये देखील एका गावात वरील निष्कर्ष आढळल्यास त्या ग्रामपंचायतीस संबंधित गावाचे नांव टाकून पिवळे कार्ड देण्यात येणार आहे.

चंदेरी कार्ड : सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या व पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या असे दोन्ही निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतीस चंदेरी कार्ड देण्यात येते.