रत्नागिरीः– कोकणातील आठ प्रमुख बंदरांसह ५९ मासळी उतरविण्याच्या केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ४ मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील २० मासळी उतरवण्याच्या केद्रांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील हर्णे व साखरीनाटे या दोन बंदरांचा समावेश आहे. तर ११ मासळी उतरवण्याचा केद्रांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै आणि साखरीनाटे या मोठ्या बंदरांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंबोळगड, हेदवी, बुधाळ, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपांढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट या मत्स्य केंद्रांचा विकास केला जाणार आहे. यामुळे मासेमारीबरोबरच व्यापारी दळणवळण तसेच पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही बंदरे व मासळी केंद्रांचा विकास खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा समावेश आहे.कामासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बंगलोर येथील सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज या (सीआयसीईएफ) या भारत सरकारच्या नोडल एजन्सीकडे तांत्रिक छानणीसाठी पाठवण्यात आला होता.सीआयसीईएफ या संस्थेच्या पथकाने या बंदरांची पाहणी करून पहिल्या टप्प्यात चार प्रमुख बंदरे व २० मासळी उतरवण्याच्या ठिकाणांना मान्यता दिली. आठ प्रमुख बंदरे व ५९ मासळी उतरविण्याच्या केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार ६३५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
या बंदर विकास योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासन प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले गेले तेव्हा पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून करायचे की सागरमाला योजनेंतर्गत राबवायचे या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.