Monday, June 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील ५,७२९ रेशनकार्ड होणार रद्द

जिल्ह्यातील ५,७२९ रेशनकार्ड होणार रद्द

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ‘मिशन सुधार’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली असून, या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ७२९ बनावट शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा आणि अंत्योदय योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक सधन आणि अपात्र व्यक्ती या कल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत आहेत, ज्यामुळे पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर बनावटगिरीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ही पडताळणी मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे.

प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण २३,५७४ रेशनकार्डांची कसून पडताळणी केली जात आहे. यामध्ये दुबार नोंदणी झालेली १,५५३ कार्डे आणि आधार क्रमांक जोडणी नसलेली म्हणजेच संशयास्पद वाटणारी ४,१७६ कार्डे अशी एकूण ५,७२९ रेशनकार्ड थेट रद्द करण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही स्वरूपाचे धान्य न उचललेली किंवा वापरात नसलेली रेशनकार्ड देखील या मोहिमेत बाद ठरवली जाणार आहेत. जर काही विशिष्ट कारणांमुळे हे कार्ड वापरात नसेल,तर संबंधित लाभार्थ्यांना त्याचे सबळ आणि कायदेशीर कारण प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्यांचेही कार्ड रद्द केले जाईल.

या मोहिमे दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल २,९७८ सदस्य हे शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे नोंदणीकृत आहेत. हे वयोवृद्ध नागरिक खरोखरच जिवंत आहेत की नाही, याची पडताळणी आता प्रत्यक्ष घरी जाऊन केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, १८ वर्षांखालील एकाच व्यक्तीचे नाव असलेल्या ‘एकल सदस्य’ कार्डांचीही स्वतंत्र चौकशी केली जाईल,जेणेकरून ती अल्पवयीन व्यक्ती खरोखरच निराधार आहे की नाही, हे स्पष्ट होईल.जिल्ह्यातील ज्या शिधापत्रिकाधारकांकडे चारचाकी किंवा इतर अधिकृत वाहने आहेत, त्यांचीही यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाची आणि आर्थिक स्थितीची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

तालुकावार पडताळणीची आकडेवारी

या विशेष मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकूण २३,५७४ रेशनकार्डांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक ६,७१३ कार्डे रत्नागिरी तालुक्यातील असून, चिपळूण ३,३८२, संगमेश्वर २,९१७, दापोली २,७१६, खेड २,१४४, लांजा १,७१९, राजापूर १,९६३, गुहागर १,०२१ आणि मंडणगड तालुक्यात ८३१ रेशनकार्डांची तपासणी केली जात आहे. अपात्र आढळणाऱ्या सर्व रेशनकार्डांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.