खुनासह विविध गुन्ह्यात समावेश; इतर गुन्ह्यातील १६७ जणांचा समावेश
रत्नागिरी:- खुन, मारामारी, अपघात आदी विविध गुन्ह्यांमध्ये अनेक वर्षे मिळत नसलेल्या १७ गुन्हेगारांना न्यायालयाने फरार घोषित केले. त्यांच्या मालमत्तेवरही टाच आणली आहेत. परंतु हे गुन्हेगार परराज्य आणि जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या नावे मालमत्ताच नसल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिस दलासमोर अनेक अडचणी येत आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. रेल्वे, रस्ते वाहतुक आणि जलवाहतुकीमुळे मोठ्या गुन्हेगारीशी जिल्ह्याचा थेट संपर्क येऊ लागला आहे. काही दिवासांपूर्वी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात मिळाले. केरळमध्ये झालेल्या बर्निंग ट्रेनमधील मृत्यूशी संबंधित संशयितही जिल्ह्यात मिळाला. अंमली पदार्थामध्येही आंतरराष्ट्रीय कनेक्शन होते. किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थ सापडत आहेत. या परिस्थितीत खुन, मारामारी, अपघात, चोरी, दरोडी आदी गुन्ह्यातील अनेक फरार आरोपींचा गेल्या काही वर्षांपासून पोलिस शोध घेत आहेत. परंतु ते वारंवार पोलिसांना गुंगारा देतात. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील पोलिस ठाण्यांसह जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या शोधात आहे. मात्र ते मिळत नसल्याने न्यायालयाने १७ आरोपींना फरारी घोषित केले आहे. फरारी घोषित केल्यानंतर त्या आरोपींची मालमत्ता जप्त केली जाते. मालमत्तेवर टाच येण्याच्या भितीने हे आरोपी हजर होतील, या उद्देशाने ही कारवाई केली जाते. परंतु ते १७ आरोपी परराज्यातील आणि जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याच्या नावे मालमत्ताच नसल्याचे पुढे आले आहे. याबरोबरच अन्य गुन्ह्यातील १६७ संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
२५ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव
गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांच्या हिटलिस्टर असलेल्या २५ जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यावर सुनावणी सुरू असून अजून एकावरही हद्दपालीची कारवाई झालेली नाही. प्रांताधिकाऱ्यांकडुन हद्दपारीची कारवाई झाल्यास गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसले, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. त्यापैकी चिपळूण येथील एकालाच हद्दपार करण्यात आले आहेत. उर्वरितांचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.