जिल्ह्यातील साडेतीन हजार आंबा बागायतदारांची मँगोनेटला पसंती

रत्नागिरी:- हापूसच्या परदेश निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ नोंदणीला जिल्ह्यात बागायतदारांचा चांगला पतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षभरापासून 3 हजार 500 पेक्षा जास्त आंबा बागायतदारांनी नवीन बागायतदार मँगोनेटची नोंदणी केलेली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या बागायतदारांना त्यांचे सर्टिफिकेट दिले जात आहे.

हापूसच्या परदेश निर्यातीसाठी जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी आता जोमाने पुढे सरसावू लागले आहेत. परदेशात निर्यातून आंब्याला चांगला दर मिळत असल्याने शासनाच्या मँगोनेट योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. मँगोनेटमध्ये गतवर्षी 2021 पर्यंत जिल्हयातील 4 हजार 566 आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. तर 3  हजार 399 आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले होते. आता 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 31 मार्च 2023 पर्यंत नोंदणी करण्याची मुदत दिलेली आहे.

युरोपियन देशांनी भारतातून निर्यात होणाऱया ताजी फळे व भाज्यांवर किडीचा प्रार्दूभाव झाल्याने आंबा निर्यातीवर सन 2013 मध्ये बंदी घातली होती. त्याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना मोठ्या पमाणात बसला होता. परिणाम कोकणातील आंबा बागायतदार 2012 पासून परदेशी आंबा निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ रजिस्टर होत आहेत. मँगोनेट सुविधेला शेतकर्‍यांकडून चांगला पतिसाद मिळत आहे. हापूसला उत्तम दर मिळावा यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मँगो नेटचा पर्याय शोधण्यात आला आहे. सन 2014-15 पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. तर दरवर्षी नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटला शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढावा यासाठी वर्षभर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मँगोनेट अंतर्गत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणच्या (अपेडा) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात 2021-22 मध्ये निर्यातक्षम आंबा बागांची मोठ्याप्रमाणात नोंदणी झाली आहे. निर्यात आंबा बागांची नोंदणी 5 वर्षासाठी वैध आहे. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. 2022-23 या वर्षासाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, 7/12, 8 अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्याकरिता आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा विभागामार्फत करण्यात आलेले आहे.