जिल्ह्यातील साडेआठ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा

रत्नागिरी:- जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होउ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाई ग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे. सद्या जिल्ह्यात लांजा व चिपळूण या दोन तालुक्यातच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भर पडत असून या दोन्ही तालुक्यातील 12 गावांतील 16 वाड्यांतील 8 हजार 670 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाळ्याचा रखरखाट आणखीनच उग्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झालेली आहे. या टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी पशासनस्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. यावर्षी चिपळूण आणि लांजा या दोन तालुक्यांना या पाणीटंचाईने ग्रासले आहे. येथील धनगरवाड्यांना सर्वाधिक झळ बसलेली आहे. तेथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी टँकरच्या फेऱया सुरू झालेल्या आहेत. लांजा तालुक्यात या तालुक्यात पालू चिंचुर्टी धावडेवाडीत 150, उंबरवणेवाडी येथे 85, हर्दखळे धनगरवाडी येथे 85, तर कोचरी ढोलमवाडी येथे 120 ग्रामस्थांना या टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या तालुक्यातील एकूण 3 गावांतील 4 वाड्यांतील 440 ग्रामस्थांना एका पाण्याच्या टँकरद्वारे आतापर्यंत 24 फेऱया पाणीपुरवठ्यासाठी मारण्यात आल्या आहेत.

चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईच्या मोठ्या समस्येने ग्रासले आहे. येथील 9 गावांतील 12 वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील 8 हजार 230 रहिवाशांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील कोंडमळा धनगरवाडी येथील 40 कुटुंबे, कादवड धनगरवाडी 1, धनगरवाडी 2 येथील 54 कुटुंबे, सावर्डे धनगरवाडी, बाजारपेठ येथील 4 हजार रहिवाशी, कुडुप धनरवाडी येथील 40, टेरव सुतारवाडी, तांबडवाडी येथील 3 हजार रहिवाशी, अडरे धनगरवाडी येथील 37, आगवे लिंबेवाडी, मधलीवाडी येथील 468, अनारी धनगवाडी येथील 349, डेरवण खालची बैध्दवाडी येथल 242 इतक्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. यासाठी पशासन स्तरावरून 1 शासकीय आणि 1 खासगी असे दोन टँकर तैनात करण्यात आले आहे. दिवसागणिक जिल्ह्dयातील वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत घट होवू लागली आहे. परिणामी पाणी टंचाई उग्ररुप धारण करण्याची चिन्हे उभी ठाकली आहे.