जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एक रुपयात विमा कवच

रत्नागिरी:- शेतकरी बांधवांना आता फक्त 1 रूपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना ही 2023- 2024 पासुन राबविण्यास मान्यता दिली गेली आहे. त्या संदर्भात हा निर्णय आहे ज्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामाकरीता पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली गेली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत सदरचा शेतकरी हिश्याचा भार सुद्धा शेतकरी यांच्या वर न ठेवता शेतकर्‍यांचा विमा हप्ता रक्कम राज्य शासना मार्फत भरण्यात येईल. त्यामुळे सन 2023- 24 पासून शेतकर्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत निश्चित करण्यात आलेली शेतकरी हिश्याची पीक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रुपये 1 वजा जाता उर्वरित फरकाची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य शासना मार्फत अदा करण्यात येईल.

सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामाकरीता काही जोखमीच्या बाबींचा समावेश देखील करण्यात आला आहे. जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी आणि लावणी न झाल्याने होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ येणे, चक्रीवादळ, पुर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड कीड रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान इत्यादी सर्व बाबींमध्ये शेतकर्‍यांना पीक विमा प्राप्त होणार आहे.