जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांची निवड कागदावरच

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शालेय पोषण आहार भरारी पथकांची शिक्षण विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी ना शाळांना भेटी दिल्या, ना शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांची निवड कागदावरच असल्याचे दिसत येत आहे.

जिल्हा परिषद शाळेत देण्यात येणार्‍या पोषण आहाराची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी जिल्हास्तरावरून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी तसेच शिक्षण विभागातील दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही निवड फक्त कागदावरच दिसत येत आहे.
जिल्ह्यात शालेय पोषण आहार भरारी पथकांची वर्षातून दोन वेळा विविध अधिकार्यांची निवड करण्यात येते. दर सहा महिन्यांनी भरारी पथकांची ऑर्डर काढून विविध अधिकार्‍यांची नियुक्ती विविध तालुक्यात करण्यात येते. त्यानुसार त्या पथकांनी शाळांना अचानक भेटी देऊन शालेय पोषण आहाराची तपासणी करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून भरारी पथकांनी जिल्ह्यातील किती शाळांना भेटी दिल्या, याचा अहवालच शिक्षण विभागाकडे पाठविला नसल्याची माहिती पुढे आली आहे.