रत्नागिरी:- जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याबरोबरच किनारा सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी लँडिंग पॉईंटवर लक्ष केंद्रीत केले जाईल. मच्छिमारांसह किनारी भागातील नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे. किनारपट्टी परिसरात काम करणार्या परराज्यातील किंवा अन्य भागातील व्यक्तीची नोंद पोलीस दलाकडे असलीच पाहिजे अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरी जिल्ह्याला १६० किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. त्यामुळे किनारी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. किनारी भागात मच्छिमारांची वस्ती अधिक आहे. मच्छिमार थेट समुद्रात वावरत असतात. त्यांना समुद्रासह किनारी भागातील हलचाली अधिक माहिती असतात. त्यामुणे त्यांच्या मदतीने किनारी सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. बाणकोट ते राजापूर या किनारी भागात असलेल्या सागरी पोलीस ठाण्यांना प्राधान्याने भेटी देणार आहोत. याची सुरुवात जयगड, पुर्णगड, शहर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली आहे. समुद्रामार्गेही किनारपट्टीची पहाणी केली आहे. सध्या आठ नौका पोलीस दलाच्या ताफ्यात आहेत. त्याच्या माध्यमातून गस्त सुरु असते. त्यामुळे किनारी भागातील लँडिंग पॉईंटवरील हालचालींवर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, सागरी सुरक्षा दलाना सतर्क करुन त्यांना पोलीस दलाशी जास्तीजास्त कसे कनेक्ट ठेवता येईल यावर विषेश भर दिला जाणार आहे. नेपाळ मधून येणार्या खलाशांची परिपुर्ण माहिती पोलीस ठाण्यांद्वारे संकलित केली जात आहे. त्यात अधिक सुस्पष्टता आणली जाणार आहे. किनारी भागात काम करणार्या परराज्य, देशातील व्यक्तीची नोंद पोलीस दलाकडे असलीच पाहिजे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.









