रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत पॉस मशीनवर कार्ड धारकांचा ठसा घेण्याऐवजी एजन्सीधारकांचे ठसे घेऊन धान्य वितरित करण्यात यावे या मागणीसाठी रास्त दर धान्य दुकानदारानी 1 सप्टेंबरपासून धान्य वितरण सेवा बंद केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमन कमी प्रमाणात होते, तेव्हा रेशन कार्डधारकाचे ठसे घेऊन सप्टेंबरपर्यंत धान्य वितरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात वाटप सुरू आहे. मात्र अशा प्रकारे धान्य वितरित करताना अनेक अडचणी येत आहेत. सर्व्हर बंद पडला तर मशीन बंद पडते. त्यामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग नियमं पाळणे कठीण होते. प्रत्येक ग्राहकाचा पॉस मशीनवर ठसा घेण्यात येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्डधारकांच्या अंगठ्याऐवजी एजन्सीधारकांचे ठसे घेऊन धान्य वाटप करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे रास्त दर दुकानादर व मदतनीस यांना शासनामार्फत विमा संरक्षण मिळावे, मागील चार महिनयांचे धान्य वाटपाचे कमिशन मिळावे, कोरोनाने राज्यात आतापर्यंत 20 ते 25 दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून कोरोना संपेपर्यंत सोशल डिस्टनसिंगनुसार दुकानदारांचे आधार प्रमाणित करून पॉस मशिनद्वरे धान्य वितरण करण्याची मुभा असे दुकानदार यांचे म्हणणे आहे.