जिल्ह्यातील मच्छीमारांसमोर जेलिफिशचे नवे संकट

रत्नागिरी:- मच्छिमारांना मासे चांगल्या प्रमाणात मिळत असताना मच्छिमारांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. मासेमारीसाठी पाण्यात टाकलेल्या जाळ्यात विषारी ‘जेलीफिश’ सापडत असल्याने मच्छिमार धास्तावले आहेत.

समुद्रात हेलकावे घेणार्‍या छत्रीच्या आकाराचे जेलीफीश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती आपल्याला जखमी करु शकतात. गेल्या काही वर्षांत जेलीफीशच्या डंखामुळे मच्छिमार जखमी झाल्याच्या घटना अनके ठिकाणी घडल्या आहेत. समुद्रकिनारपट्टी परिसरात साधारण तीन प्रकारच्या जेलीफीश आढळतात. ठराविक मोसमात हे जेलीफिश किनार्‍यालगत येतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू-बटन’, पावसाळ्यात ’ब्लू-बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीफिश किनार्‍यालगत येतात. वजनाने हलक्या असल्याने वार्‍याच्या दिशेने हेलकावे खात ते समुद्रकिनारी पोहोचतात. मोठे जेलीफिशचे शरीर 10 इंच आकाराचे शरीर आणि दोरीसारखे 2 फूट लांबीचे पाय असतात जेली फिशचा एखाद्याला डंख झाल्यास त्याठिकाणी लाल रंगाचे व्रण उठतात. तसेच त्या व्यक्‍तीला असह्य वेदना होतात.

समुद्रात टाकलेली जाळी बोटीत घेताना त्यामध्ये अडकलेले जेलीफिश काढून फेकून देताना या जेलीफिशचे तंतू मच्छीमारांसह कामगारांच्या हातांना स्पर्श करीत असल्याने अंगाला मोठी खाज सुटते. त्यामुळे खलाशी कामगारांना कुठलीही इजा होऊ नये, यासाठी मच्छीमार बांधव समुद्रात जेलीफिश दिसल्यास त्या भागात मासेमारी करत नाही. त्यामुळे तेथे जाण्याचा खर्च फुकट जात आहे.
खोल समुद्रात असणारे जेलीफिश काहीवेळा किनारपट्टी भागातही आढळून येतात. रत्नागिरी शहरानजिकच्या भाट्ये किनारीही काही प्रमाणात जेलीफिश आढळून येत आहेत. किनार्‍यावरील वाळूत हे जेलीफिश दिसून येत आहेत. यामुळे स्थानिक मच्छिमारांबरोबरच येथे फिरण्यासाठी येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. हे जेलीफिश आकर्षक असले तरी त्यांना स्पर्श करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.