रत्नागिरी:- अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्यावर आणणे हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन, जिल्ह्यात दि. 1 ते 15 जुलै या कालावधीमध्ये विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 83 हजार (0 ते 5 वयोगट) इतक्या बालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
देशातील व राज्यातील बालमृत्यू कमी करणे हे प्रमुख उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमध्ये अतिसार हे प्रमुख कारण असून, या बालकांच्या मृत्युपैकी 7 टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होतात. अशा मृत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसार झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकिट व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. अतिजोखमीची क्षेत्रे आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करणे, पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे व काळजी घेणार्यांचे योग्य समुपदेशन करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
या उपक्रमांतर्गत जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य केंद्रामधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येईल. आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कॉर्नरची स्थापना करण्यात येणार आहे. पाच वर्षाखालील मुले असलेल्या कुटुंबाना आशा स्वयंसेविकामार्फत ओआरएस व झिंक गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्यात येईल. अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करणे. प्रचार प्रसिद्धी इत्यादी कृती करण्यात येणार
आहेत.
याबाबत नुकतीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणु समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला बाल विकास विभाग) श्रीकांत हावळे यांची उपस्थिती होती.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा हा आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात पाच वर्षाआतील एकूण 83 हजार 264 लाभार्थी असून, पालक व काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड 19 आजाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबवण्याचे काम या विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमामुळे शक्य होणार असल्याचे सांगितले.
पालक व काळजी वाहकांना निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे तसेच हात धुण्याचे महत्त्व सांगण्यात येऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात येतील. अतिसाराची लक्षणे, धोक्याची चिन्हे तसेच प्रोटोकॉलनुसार उपचार पद्धती व आवश्यक वाटल्यास संदर्भ सेवा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. अतिसारामध्ये स्तनपानाबरोबरच ओआरएस व झिंकचे महत्व सांगण्यात येईल. ग्रामस्तरावर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.