‘चला जाणू या नदीला’ उपक्रम ; समस्या व उपाययोजनांचा अहवाल
रत्नागिरी:- अतिवृष्टीत नद्यांना येणार्या पुरामूळे दरवर्षी चिपळूण, खेड शहरे पाण्याखाली जातात. राजापूर मध्ये हीच परिस्थिती असते. त्यावर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी ‘चला जाणू या नदीला’ हा उपक्रम राज्यात राबवीला जात आहे. यासाठी 103 नद्यांची निवड केली असून रत्नागिरी जिल्ह्यातील पाच नद्यांचा समावेश आहे. यात्रेद्वारे नद्यांचा सविस्तर अभ्यास करुन समस्या व उपायोजनांचा अहवाल वर्षभरात जिल्हाधिकार्यांना सादर करावयाचा आहे. त्यानुसार अंमलबजावणी करुन पुरमुक्त शहर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनामध्ये चिपळूण, महाड येथील पुराबाबत जोरदार चर्चा झाली होती. पुर येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. चिपळूणात वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तात्काळ सुरु केल्यामुळे फायदा झाला. या पावसाळ्यात पुराचे पाणी तुलनेत कमी होते. याचा विचार करुन शासनाने राज्यातील सर्व नद्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पर्यटन विभागाने चला जाणू या नदीला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर आणि दुष्काळाचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. वाढते नागरिकरण आणि औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढतो. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ट जलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमधील वहन, साठवण क्षमता कमी होत आहे. हे लक्षात घेऊन नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती गठीत केली आहे. नदी संवाद यात्रेची सुरवात 2 ऑक्टोबरपासून झाली. या अंतर्गत राज्यातील 103 नद्यांचा अभ्यास होणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, सावित्री या नद्यांचा समावेश आहे. नदीचा सर्वकष अभ्यास करणे, अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा बनवणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्याबाबत प्रचार करणे, नदीतट व प्रवाह जैवविविधतेबाबत जिल्ह्यात प्रसार करणे, मागील पाच वर्षातील पुर व दुष्काळाची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, अतिक्रमण आणि प्रदुषण याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. नद्यांची माहिती संकलित करुन केली जाणार आहे. या समितीत विविध विभागाचे अधिकारी समाविष्ट असून जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सदस्य सचिव असतील. वाशिष्ठीच्या पुरामुळे चिपळूण, जगबुडीच्या पुरात खेड शहर तर बावनदीमुळे किनारी भागातील लोकवस्तीचा परिसर बाधित होतो. पुराची समस्या निर्माण होण्याला नदीपात्रात साचलेला गाळ हे प्रमुख कारण मानले जाते. त्याचबरोबर अन्य अनेक कारणेही आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत यात्रेचा पहिला टप्पा होईल. 1 ते 20 जानेवारी 2023 या काळात अहवालाचे अंतिमीकरण केले जाईल. प्रक्षेत्र भेट किंवा शिवार फेरीवेळी समन्वयकांनी अभ्यासपूर्ण नोंदी करुन जिल्हाधिकार्यांना सादर करावयाच्या आहेत. यासाठी लागणारा खर्च हा जिल्हा नियोजनमधून करावयाचा आहे.









