रत्नागिरी:-शालेय मुलांच्या संपलेल्या परीक्षा व सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्या त्यामुळे चार दिवस पर्यटकांसह चाकरमान्यांचे पायही जिल्ह्याकडे वळू लागले आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोलाीकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता गृहीत धरुन हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे जवळपास 75 टक्केहून अधिक बुकींग झाले आहे.
मागील दोन वर्ष कोरोनामुळे घरामध्येच अडकून पडण्याची वेळ आली होती. गणपतीपासून निर्बंधामध्ये काहीप्रमाणात शिथिलता मिळाल्याने पर्यटन व्यवसाय थोडी गती घेऊ लागला होता. त्यातच दोन महिन्यापूर्वी शासनाने निर्बंध उठवल्यामुळे नागरिकांनी कोरोनाची भिती दूर केली आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्यामुळे व सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्याने कोकणात येणार्या चाकरमान्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. गुरुवारी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती, 15 रोजी गुड फ्रायडे आणि त्याला जोडून आलेला शनिवार व रविवार या सुट्ट्यांमुळे पर्यटनाची आखणी करण्यात आलेली आहे.
चाकरमान्यांप्रमाणेच पर्यटकांचे पायही रत्नागिरी जिल्ह्याकडे वळू लागले आहेत. विशेषत: समुद्रकिनार्यांना अधिक पसंती पर्यटकांकडून मिळत आहे. गणपतीपुळे, गुहागरमधील वेळणेश्वर या समुद्रकिनारे लाभलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांकडे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे पाय मोठ्याप्रमाणात वळत आहे.
गणपतीपुळेसह गुहागर, दापोली येथील समुद्रकिनार्यांना पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. बुकींगसाठी हॉटेल व्यावसायिकांकडे चौकश्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात जवळपास 75 टक्केहून अधिक हॉटेल व लॉजिंगचे बुकींग झाले आहे. चार दिवसात जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक येणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी हॉटेल व्यावसायिकांकडून सुरु आहेत.
जिल्ह्यात येण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्या कोकणकन्या, राज्यराणी एक्स्प्रेसला मोठी वेटींग आहे. खासगी बसेसचे तिकीटभाडेही हजारच्या घरात गेले आहे. जिल्ह्यांतर्गत फिरण्यासाठी प्रवासी गाड्यांना मागणीही वाढली असल्याचे एका खासगी वाहन व्यावसायिकाने सांगितले. वॉटर स्पोर्टस चालकांनीही नवनवीन गोष्टींची तयारी केली आहे. गणपतीपुळे येथे सुरु करण्यात आलेल्या वॉटर स्पोर्टसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही येथील व्यावसायिकांनी सांगितले.