रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले अनेक वर्ष डायलिसीस विभागाचे कामकाज सुरळीत पणे सुरू आहे. शेकडो रुग्णांना या युनिटमुळे जीवदान मिळाले आहे. मात्र, जिल्ह्यातील अन्य भागात ही डायलिसीस युनिट सुरू व्हावे, यासाठी 4 तालुक्यात हे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लांजा, कामथे, दापोली, खेड येथे डायलिसीस युनिट सुरू करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी लवकर व्हावी, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांना सांगण्यात आल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. डायलिसीससाठी जिल्हयाच्या मंडणगडच्या टोकापासून शासकीय रुग्णालयात रुग्ण प्रवास करून येत असतात त्यांना सोयीचे व्हावं, यासाठी या मध्यवर्ती ठिकाणी नवीन डायलिसीस युनिट सुरू करण्यात येईल असे सामंत म्हणाले.









