जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. देवरुखनंतर तालुक्याती जाकादेवी, संगमेश्वर या परिसरात अज्ञातांनी चोरी करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. बंद घरांचे दरवाजे उचकडून चोरी केली जात आहे. ग्रामीण भागातील अशा घरांना चोरट्यांनी लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. नुकतेच तालुक्यातील जाकादेवी येथील ज्वेलर्स दुकानासाठी भाड्याचे घेतलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न केला तर आयडिया व वोडाफोन कंपनीचे केबल चोरी करत असताना पोलिसांनी तीन परप्रांतियांवर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाकादेवी येथील मंगळवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास पंडित ज्वलेर्स या दुकान गाळ्यामध्ये निदर्शनास आली. फिर्यादी विलास पंडित ज्वेलर्स दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज रात्री दीडच्या सुमारास पाहिले असता कोणताही अनुचित प्रकार झालेला नव्हता. मात्र सकाळी नऊच्या सुमारास दुकान मालकांचा मुलगा अमोल पवार याने पाहिले असता दुकानाचे शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला असल्याचे त्याने सांगितले. केवळ चोरीचा प्रयत्न अज्ञातांकडून झाला. तसेच उल्का विनायक पवार (रा. तरवळ कोळीनगर) यांच्या राहतेघरी चोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी सोनार विराज विलास पंडित (वय ३०, रा. गावफाटा चाफे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान देवरुख (ता. संगमेश्वर) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील साहित्य, सोने-चांदी असा मुद्देमाल पळविला होता. सोमवारी (ता. ५) सप्तेश्वर रोड येथील आयडीया कंपनीचा टॉवर येथील २ जी बीटी चे साहित्य व केबलची चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणी मोबाईल टॉवर केअर टेकर फिर्यादी संदिप रामचंद्र पवार (वय ४०, रा. नावडी, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित फुरकान अब्दूल हक (२५, रा. विजयूर ता. कैसरगंज जि. बहरईच राज्य उत्तरप्रदेश), सय्यद इंजमाम सय्यद हसन व एक ३० वर्षाचा पुरुष (नाव गाव माहिती नाही) यांच्यावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. परप्रांतियांकडून अशा घटना होत असल्याचे पोलिस तपासात दिसून येत आहे. चोरट्यांनी ग्रामीण भागातील बंद घरांना लक्ष केल्याचे चित्र आहे.