जिल्ह्याच्या किनारपट्टी भागावर अवकाळी पावसाचे ‘ढग’

रत्नागिरी:- मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीत काही भगात अवकाळी पाऊस झाल्यानंतर बुधवारीही मळभी आच्छादन कायम होते. गुरूवारपासून पुन्हा एकदा जिल्ह्यातील किनारपट्टी बहुतांशी भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांत 7 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून शुक्रवार, शनिवारी पावसाचा विस्तार कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वातावरण ढगाळ असले तरी अनेक ठिकाणी सरासरी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत उसळी घेत आहे. पश्चिम आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे एकत्र आल्यामुळे चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागांमध्ये दमट वारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे किनारी भागात अनेक जिल्ह्यांत तापमानात झालेली वाढदेखील अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे हवामानतज्ज्ञांनी आडाखे आहेत.

‘आयएमडी’कडून एप्रिलमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र कोरडे वातावरण असू शकते. शुक्रवार आणि शनिवारी येथे आभाळ अंशतः ढगाळ असेल. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शुक्रवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही पाऊस पडेल. या काळात वार्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाचा परिणाम कोकण किनारपट्टी भागात झाला आहे. त्याच्या प्रभावाने आर्द्रतेत वाढ झाली आहे. सकाळ संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 65 ते 78 टक्क्यांहून अधिक आर्द्रतेचे प्रमाण नोंदविले.