जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट राज्यात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी आहे. राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) आहे. हे प्रमाण 89.46 टक्के आहे. फैलाव रोखण्यात यश आले आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचाही चांगला फायदा झाला. 14 लाख लोकसंख्येच्या सर्व्हेमध्ये 291 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. ताप असलेल्यांचे प्रमाण 38 टक्के आहे.  

गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात फैलावलेल्या कोरोनाने अनेकांच्या मनात धडकी भरली होती. भविष्यात याचा संसर्ग वाढून जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडण्याचा अंदाज होता. गणेशोत्सवानंतर तशी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा प्रशासनानेही तसा अंदाज बांधला. ऑक्टोबरअखेर 9 हजार रुग्ण वाढतील असा अंदाज होता; मात्र भीतीने जनजागृती झाली. तपासण्या वाढत गेल्याने निदान होऊन उपचार होऊ लागले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्याचे चित्र आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचे जिल्ह्यात 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. 4 लाख 10 हजार 99 घरांचा सर्व्हे झाला. 14 लाख 14 हजार 415 लोकांची तपासणी केली. त्यापैकी 30 टक्के लोकांना ताप होता. सर्दी-खोकला असलेल्यांचे प्रमाणही 2 हजाराच्या दरम्यान होते तर किरकोळ आजारी असलेल्यांचे प्रमाण 1 लाख 12 हजार 79 पर्यंत होते. अगदी सौम्य लक्षणे असलेले 2 हजार 170 लोक होते. या सर्वांची वेळेवर तपासणी झाली. त्यांच्यावर योग्य उपचार झाले. योग्य ती खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आले.