जिल्हा एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला आणणार: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा भविष्यात एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात रत्नागिरीत कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यापीठाच्या उपकेंद्रासह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्रदेखील रत्नागिरीत सुरू होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत रत्नागिरीत दोन्ही विद्यापीठांची उपकेंद्र रत्नागिरीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी २ एकर जागा नाचणे आयटीआय परिसरात उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.

याबाबत माहिती देताना ना. उदय सामंत यांनी सांगितले की, कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यापीठ हे नागपूर-रामटेक येथे आहे. आजपर्यंत हे विद्यापीठ नागपूरच्या बाहेर गेले नाही. आता या विद्यापीठाने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला राज्य शासनानेदेखील सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील संस्कृत विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र हे रत्नागिरीत सुरू होणार असून त्या पाठोपाठ पुणे, औरंगाबाद, नांदेड आदी ठिकाणी या विद्यापीठाचा विस्तार होणार असल्याचे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.कवी कालिदास संस्कृत विश्‍वविद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र हे पद्मश्री भारतरत्न पी.व्ही. काणे यांच्या नावाने सुरू होणार असल्याचे ना. सामंत यांनी यावेळी जाहीर केले. या संस्कृत उपकेंद्राकरिता रत्नागिरी बसस्थानकासमोरील बी.एड. कॉलेजच्या जागेत सामंजस्य करारानुसार बांधकाम झालेले आहे. त्यातील २० हजार स्क्वेअर फूट बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण विभागाला देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार येत्या १५ दिवसात संस्कृत उपकेंद्राला २० हजार स्क्वेअर फूट बांधकाम उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

याच पाठोपाठ जगातले पहिले छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय व रिसर्च सेंटर हेदेखील रत्नागिरीत सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर रिसर्च करण्यासाठी आता अभ्यासकांना रत्नागिरीत यावे लागणार आहे. त्याचबरोबर कोकणात स्पर्धा परीक्षा केंद्र  सुरू व्हावीत अशी मागणी होती. त्यानुसार रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.रत्नागिरीतील स्पर्धा परीक्षा केंद्र हे मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच रत्नागिरीतील पॉलिटेक्निक विद्यालयाचे लवकरच रूपडे पालटणार असून २५ कोटी रूपयांचा निधी खर्च करून या ठिकाणी प्रशस्त व सुंदर इमारत उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा एज्युकेशनल हब म्हणून भविष्यात नावारूपाला येईल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीत भविष्यात रिसर्च सेंटर सुरू झाल्यास येथील बोलीभाषांचा अभ्यासदेखील होणार आहे. त्याचबरोबर सागरी विद्यापीठदेखील रत्नागिरीत सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.