जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीचा खोटा आदेश बनवणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रत्नागिरी:- आयएएस परीक्षेत नापास झाल्यानंतर घरच्यांना तोंड दाखवायचे कसे? या विवंचनेत पडलेल्या तोतयाने आपल्या मित्राच्या सहाय्याने बनावट पोस्ट तयार करून आपली नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी झाल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अर्जुन संकपाळ या भामट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ओणी-राजापूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये रत्नागिरीचे कलेक्टर लक्ष्मीनारायण मिश्रा यांची आंतरराज्य बदली झाल्याचे नमूद करून त्यांच्याजागी अर्जुन संकपाळ यांची नियुक्ती झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याजागी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांची नियुक्ती दाखविण्यात आली होती. २७ एप्रिलचे पत्र होते. त्यावर महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांची डिजिटल स्वाक्षरी होती.

अखेरीस जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश खोटा असल्याचे जाहीर केले व त्याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी ओणी येथील शेरलिन मोन्टा रिसॉर्टच्या हॉटेल मालकाची चौकशी केली. यावेळी रिसॉर्टमध्ये अर्जुन संकपाळ व त्याचे कुटुंबीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या रिसॉर्टमधून अर्जुन संकपाळ याला चौकशीनंतर ताब्यात घेतले. पोलिसांनी बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी अर्जुन संकपाळ याच्याविरोधात भादंविक ४६५, ४६९ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.