रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी भागात चोरी करणारे चोरटे आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात पोहोचले आहेत. बुधवारी रात्री नियंत्रण कक्षातील तुषार ईश्वर चंदनशिवे या महसूल कर्मचाऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला. ज्या इमारतीला पोलिसांचे 24 तास संरक्षण असते त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून रात्री चोरट्याने मोबाईल लांबवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महसूल कर्मचारी तुषार ईश्वर चंदनशिवे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षात ड्युटीला होते. हा कक्ष 24 तास खुला असतो. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने नियंत्रण कक्षातील सुमारे 7 हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल लांबवला. तुषार चंदनशिवे यांनी याबाबतची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संविधान कायदा 2023 चे 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जुन्या इमारतीत तळमजल्याला कोषागार कार्यालय आहे. तेथे 24 तास पोलिसांचा खडा पहारा असतो. तर नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्रात 24 तास पोलिसांचा एक कर्मचारी कार्यरत असतो. पावसाळ्यात कायमस्वरूपी कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातून रात्रीच्या वेळी मोबाईल चोरीला गेलाच कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्याने मोबाईल लांबवला तेव्हा नियंत्रण कक्षात कोणीच नव्हते का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. चोरट्याने खरंच मोबाईल लांबवला असेल तर पोलिसांसहीत नियंत्रण कक्षातील यंत्रणा त्यावेळी कुठे होती? असे अनेक प्रश्न या चोरीमुळे निर्माण झाली आहे.
शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास सुरू आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मागविले आहेत. त्यामुळे मोबाईल नेमका कोणी लांबवला? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.