दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेत नम्रता भाटकर या महिलेला मारहाण करीत सुरीने वार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता भाटकर यांच्या घराच्या अंगणामधील कचरा काढत असताना त्यांची जाऊबाई विनिता भाटकर हिने त्यांचा कचरा नम्रता भाटकर यांच्या अंगणामध्ये टाकते म्हणून नम्रता हिने आपला पती विनोद भाटकर यांना त्या बाबत सांगितले. नम्रता हिने सांगितले म्हणून विनोद मधुकर भाटकर यांनी नम्रता भाटकर हिलाच मारहाण करून शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे नम्रता भाटकर हिचा दीर विलास हा तेथे आला व तो देखील नम्रताला शिवीगाळ करून त्याच्या हातातील भाजी कापण्याची सुरी नम्रताच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व मनगटांमध्ये मारून तिला जखमी केले. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात नम्रता हिने फिर्याद दाखल केली असून विनोद भाटकर, विलास भाटकर, विनिता भाटकर (सर्व रा. जालगाव बाजारपेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.









