जादूटोणाव्दारे उपचार करण्याच्या नावाखाली दाम्पत्याची लाखोंची फसवणूक

रत्नागिरी:-जादूटोणाव्दारे दुखापत बरी करतो अशी बतावणी करत सांगलीतील वृध्द दाम्प्त्याची लाखोंची फसवणूक करणार्‍या भोंदुला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.रविवारी  त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मुस्ताक इसा काझी (50, रा.केळ्ये मजगाव, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात जगन्नाथ सदाशिव पोतदार (72, रा.शिराळा, सांगली) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,जगन्नात पोतदार यांच्या पत्नीच्या उजव्या पायाला जखम झाली होती.वैद्यकिय उपचार करुनही ती बरेच दिवस आजारीच होती.तेव्हा पोतदार यांच्या एका मित्राने त्यांना मुस्ताक काझीची माहिती देउन ते हा आजार बरा करतील असे त्यांना सांगितले.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सदाशिव पोतदार पत्नीसह मुस्ताक काझीकडे आले.

काझीने आजाराविषयी त्यांच्या पत्नीकडून माहिती घेतली असता माझे दागिने एका बाईने लग्नात घालण्यासाठी घेतले होते.ते परत केल्यापासून मी आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.याच संधीचा फायदा घेत काझीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने मागून घेत त्यांच्यावर मशिदित पोथी वाचून शुध्दीकरण करतो असे सांगितले.परंतू बराच कालावधी लोटला तरी काझीने दागिने परत न देता परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यांची फसवणूक केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगन्नाथ पोतदार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी शनिवारी मुस्ताकला अटक केली.