राष्ट्रवादीची मागणी; सीईओना निवेदन
रत्नागिरी:- शहरातील आलिमवाडी येथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी 27 लाख मोजण्याची गरज नाही. पंधरामाड येथील टाकीबाबत निर्माण झालेला प्रश्न शाळा क्र.20 येथील एखाद्या कोपर्यामध्ये टाकी उभी करून सोडविता येईल. 4 कोटी 27 लाखाचा नाहक पालिकेवर पडणार खर्च कमी होईल. जनतेने भरलेल्या विविध करांमधून हा खर्च होणार आहे. एखादी चुकीची घटना किंवा निर्णयामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असेल तर जनहिताचा विचार करून आपले अधिकार व कर्तव्य म्हणून कलम 308 अन्वये काम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना कळवावे, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना दिले.
रत्नागिरी पालिकेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेमध्ये सुधारित नळपाणी योजना मंजूर आहे. मात्र खडप मोहल्ला येथील पाण्याची टाकी आणि पंधरामाड येथील टाकीबरोबर असलेले वितरण पाईपलाईन मंजूर आहेत. पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नाहीत म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडे शासकीय जमिनीची मागणी केली होती. खडपमोहल्ला येथे सरकारी जमीन उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली. पंधरामाड येथे असलेल्या टाकीबाबत निर्माण झालेला प्रश्न देखील शाळा क्र.20 येथील एखाद्या कोपर्यामध्ये टाकी उभी करता येईल. त्यासाठी लागणारी पाईल फाऊंडेशन करता येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळविलेले आहे. त्यामुळे आलिमवाडीच्या जागेची आवश्यकता नाही, असेही कळविलेले. ज्या पत्रामध्ये आलिमवाडी येथील जागेमध्ये दोन्ही टाक्या काठोकाठ बांधता येतील. त्यासाठी जमिन खरेदीसाठी होणारा खर्च 1 कोटी 27 लाख 32 हजार आहे. त्याला 900 मीटर पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्याची अंदाजित रक्कम तीन कोटी आहे. म्हणजे एकुम खर्च 4 कोटी 27 लाख 32 हजार एवढा आहे. हा खर्च नाहक पालिकेवर पडणार आहे. हा सर्व खर्च जनतेने पालिकेला भरलेल्या विविध करांमधून होणार आहे. याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. पालिका स्वायत्त संस्था असून नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष हे त्याचे ट्रस्टी व अध्यक्ष असतात. प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकारी आहात. आपल्या नजरेस एखादी चुकीची घटना किंवा पालिकेचे आर्थिक नुकसान होत असेल तर ते आपल्या अधिकार व कर्तव्य म्हणून जिल्हाधिकार्यांना कळवून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये हे काम रद्द करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, कुमार शेटये, प्रदेश युवक सचिव बंटी वणजू या शिष्टमंडळाने निवेदन दिले.









