Saturday, June 20, 2026
spot_img
Home रत्नागिरी जाकीमिऱ्या, काळबादेवीत ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग मोकळा

जाकीमिऱ्या, काळबादेवीत ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सागरी दळणवळणाला आणि पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या आणि काळबादेवी या दोन प्रमुख किनारी गावांमध्ये अत्याधुनिक ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या दोन्ही कामांच्या अंदाजपत्रकाला अधिकृतपणे प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी एकूण २९ कोटी ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

सागरी मंडळाच्या प्रस्तावानुसार, जाकिमिऱ्या येथे पाईल जेट्टीच्या बांधकामासाठी १४ कोटी ८६ लाख ४७ हजार २५२ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, काळबादेवी येथील पाईल जेट्टीच्या उभारणीसाठी १४ कोटी ९८ लाख ३२ हजार ६७ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणार आहे. या नवीन जेट्टींमुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या नौका सुरक्षितपणे किनाऱ्याला लावण्यासाठी हक्काची आणि आधुनिक जागा उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक सुकर आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.

राज्य शासनाने सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या’ सहायक अनुदानातून या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गृह विभागाच्या उप सचिव शुभांगी पोटे यांच्या स्वाक्षरीने हे दोन्ही स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. या प्रकल्पांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी तांत्रिक निकष, निविदा प्रक्रिया आणि वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या देखरेखीखाली या दोन्ही जेट्टींचे आराखडे निश्चित केले जातील. रत्नागिरीतील या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे केवळ सुरक्षित वाहतूकच नव्हे, तर भविष्यात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन किनारपट्टीच्या अर्थकारणाला मोठी उभारी मिळणार आहे.